नुकताच राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रा्ष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांनी आज नाशिक येथील चवदार तळ्यावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे.
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “जाहीर निषेध!जाहीर निषेध!स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी”, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
https://x.com/amolmitkari22/status/1795719137077186958
या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट आक्रमक झाला असून त्यांनी आंदोलन केले आहे. आव्हाडांनी थोर महापुरूषांचा अपमान केला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकारावर जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या पोस्टरवर मनुस्मृती लिहिलं होतं म्हणून ते भावनेच्या भरात फाडले. त्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो होता हे माझ्या लक्षात आलं नाही. पण यावरून विरोधक राजकारण करणारच. तसेच माझ्या हातून चूक झाली आहे त्यामुळे मी माफी मागतो. त्यावर मला मनुस्मृती दिसली म्हणून मी फाडले. पण जर त्यावर बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून मी ते पोस्टर फाडले असं कोणी म्हणत असेल तर तो मूर्ख आहे, असं आव्हाड म्हणाले.