Prajwal Reavanna : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले जनता दलचे निलंबित नेते प्रज्वल रेवन्ना लवकरच भारतात परतणार आहे. त्याने 30 मे रोजी म्युनिक ते बंगळुरूला परतीच्या विमानाचे तिकीट बुक केले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विशेष तपास पथकाच्या (SIT) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना 31 मे रोजी बेंगळुरूला पोहोचण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेवण्णा बेंगळुरूला पोहोचताच त्याला अटक करण्यासाठी एसआयटी केम्पेगौडा विमानतळावर सतत लक्ष ठेवून आहेत. सेक्स स्कँडलचे प्रकरण समोर येताच रेवन्ना परदेशात पळून गेला होता. कर्नाटक राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आक्षेपार्ह व्हिडिओंची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत ज्यात रेवन्ना अनेक महिलांचे लैंगिक शोषण करताना दिसत आहेत. रेवण्णावर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
नुकतेच एचडी देवेगौडा यांनी त्यांच्या नातवाला भारतात परतण्याचा सल्ला दिला आहे. तसे न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे. यानंतर प्रजलवा रेवन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता ज्यामध्ये त्यांनी 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.