भारत देश गेल्या १० वर्षांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी
करत आहे. संरक्षण क्षेत्रात भारत मोठ्या प्रमाणात विकास करत आहे. संरक्षण
क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. संरक्षण क्षेत्रात निर्यातीमध्ये देखील भारताने
मोठी कामगिरी केली आहे. भारताने संरक्षण
सिद्धता वाढवण्यावर भर दिला आहे. नवनवीन लढाऊ विमाने, नौका, पाणबुड्या रणगाडे यांची निर्मिती आणि खरेदी केली जात आहे. भारताने
आपली हवाई संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी राफेल विमानांची खरेदी केली होती.
भारताची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढणार आहे. कारण राफेल मरीन फायटर जेटचा करार फ्रान्ससोबत
होणार आहे. या कराराची सर्व तयारी पूर्ण झाली असून फ्रेंच अधिकारीही भारतात आले
आहेत. ५० हजार कोटी रुपयांच्या या डीलमुळे
भारताला एकूण २६ राफेल एम लढाऊ विमाने मिळणार आहेत. त्यापैकी २२ सिंगल सीटर आणि
उर्वरित ४ डबल सीटर असतील. या लढाऊ
विमानामुळे आपल्या देशाची ताकद आणखी वाढणार आहे. हा करार ३० मे रोजी होण्याची
शक्यता आहे.
या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी
फ्रान्सचे अधिकारी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. करारानंतर
भारताला मिळालेली २६ राफेल एम लढाऊ विमाने आयएनएस विक्रांत आणि आयएनएस
विक्रमादित्यवर तैनात करता येतील. करारानंतर येणारी ही लढाऊ विमाने भारतीय
विमानवाहू युद्धनौकांवर तैनात मिग-२९ के लढाऊ विमानांना मदत करतील.