सध्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून देशभरात
जोरदार प्रचार करण्यात येत आहे. लोकसभेसाठी ७ व्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यातील
मतदान बाकी राहिले आहे. ४ जून रोजी या देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार की,
एनडीए
तिसऱ्यांदा सरकार बनवणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम सुरु
असतानाच मणिशंकर अय्यर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर त्यांनी माफी
देखील मागितली आहे. मात्र त्यांच्या विधानाचा भाजपाने जोरदार समाचार घेतला आहे.
या प्रकरणात भाजपाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली
आहे. भाजपच्या वतीने गौरव भाटिया म्हणाले, ”जवाहरलाल
नेहरूंच्या काळात चीनने भारताची ४३ हजार चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली होती.
ही जमीन अजूनही चीनच्या ताब्यात आहे. मणिशंकर अय्यर यांनी चीनला क्लीन चिट दिली.
राहुल गांधींच्या संमतीशिवाय हे होऊ शकते का? चीनचे गुणगान
गाणे आता बंद करावे. काँग्रेसच्या अध्यक्षांनी देखील याबाबतीत मौन बाळगले आहे.
मणिशंकर अय्यर यांचे विधान काँग्रेसची भारतविरोधी भूमिका प्रदर्शित करते.”
१९६२ च्या चिनी हल्ल्याबद्दल बोलताना
मणिशंकर अय्यर यांनी समोर कथित शब्द वापरला. मात्र, नंतर त्यांनी
याबाबत माफी मागितली. अय्यर मंगळवारी फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबमध्ये आयोजित
कार्यक्रमात गेले होते. यादरम्यान अय्यर यांनी एक किस्सा सांगितला. ज्यामध्ये
त्यांनी ऑक्टोबर १९६२ च्या चिनी आक्रमणासंदर्भात कथित शब्द वापरला होता. ते
म्हणाले, ‘ऑक्टोबर १९६२ मध्ये चिनी लोकांनी भारतावर कथित हल्ला केला.‘ या
वक्तव्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी माफीही मागितली आहे. ते म्हणाले, “चीनी
हल्ल्यापूर्वी कथित शब्द चुकून वापरल्याबद्दल मी बिनशर्त माफी मागतो.”