ओडिशातील पुरी येथे जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या चंदन यात्रेदरम्यान मोठा अपघात झाला आहे. या यात्रेदरम्यान फटाक्यांच्या ढिगाचा स्फोट झाल्याने 15 भाविक भाजले आहेत. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नरेंद्र पुष्करिणी सरोवर येथे चंदन यात्रा उत्सवासाठी शेकडो लोक जमले होते. या दरम्यान, भाविक फटाके फोडत असताना त्यातील एक ठिणगी फटाक्यांच्या ढिगात पडली त्यामुळे स्फोट झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांचा स्फोट झाल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. त्याचवेळी फटाक्यांपासून वाचण्यासाठी काही लोकांनी तलावात उड्या घेतल्या. तर सध्याजखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोशल मीडिया X वर लिहिले, पुरी नरेंद्र पूलजवळ झालेल्या अपघाताबद्दल ऐकून दुःख झाले. मुख्य प्रशासकीय सचिव आणि जिल्हा प्रशासनाला जखमींवर योग्य उपचार करण्याच्या आणि व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून केला जाणार आहे. मी सर्वांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.