PM Modi Meditation : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिलास्मारकरावर चिंतन करणार आहेत. तर चिंतन करण्याआधीच राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू झाला आहे. पंतप्रधानांच्या ध्यानधारणेवर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसे करण्यापासून रोखण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळात उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे की, ४८ तासांच्या मौन कालावधीत कोणालाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार करण्याची परवानगी देऊ नये. कोणताही नेता असो, त्याला आमचा आक्षेप नाही. मौनव्रत उपोषण असो वा अन्य काही असो, मौनाच्या काळात अप्रत्यक्ष प्रसिद्धी नसावी.
आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारकेली आहे की 30 मेला संध्याकाळी पंतप्रधान मोदी ध्यानधारणा करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांचा ध्यानधारणेचा कालावधी 30 मे ते 1 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. तर हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. कारण हे एकतर प्रसिद्धी सुरू ठेवण्यासाठी डावपेच आहेत, असंही अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.
तसेच अभिषेक मनु सिंघवी यांनी मीडियाला सांगितले की, त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जूनच्या संध्याकाळी 24 किंवा 48 तासांनंतर ध्यानधारणा सुरू करावे. पण उद्यापासून ते सुरू करण्याचा त्यांचा आग्रह असेल, तर ते छापील किंवा दृकश्राव्य माध्यमांतून प्रसारित होण्यापासून रोखले पाहिजे, असंही सिंधवी म्हणाले.
दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील पंतप्रधानांच्या ध्यानधारणेवर आक्षेप घेतला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 30 मे रोजी संध्याकाळी निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदानाचा मूक कालावधी असेल. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींना ध्यान करण्याची परवानगी दिली जाऊ नये, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.