देवी अहिल्याबाई इंदूरच्या महान शासक होत्या. देवी अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण भारतावर प्रभाव पडला होता. 31 मे रोजी त्यांची 299 वी जयंती येत आहे. या दिवसापासून संपूर्ण देशात लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी साजरी होणार आहे. यासाठी “लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी उत्सव समिती” स्थापन करण्यात आली आहे.
प्राध्यापिका चंद्रकला पडिया या आयोजन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील. होळकर घराण्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि सदस्य उदयसिंह राजे हे होळकर समितीचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. पद्मविभूषण सोनल मानसिंग आणि पद्मभूषण सुमित्रा महाजन हे समितीचे संरक्षक आहेत.समितीच्या सदस्यांमध्ये देशातील अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
समितीच्या सचिव डॉ.माला ठाकूर म्हणाल्या की, समितीच्या माध्यमातून यावर्षी देशभरात लोकमाता अहिल्याबाई यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. इंदूर आणि महेश्वर ही लोकमाता अहिल्याबाईंची कार्यक्षेत्रे असून, 31 मे रोजी इंदूरमध्ये उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे शिष्य गौतम काळे हे अहिल्याबाईंच्या जीवनातील वैशिष्ट्यांवर आधारित रंगमंचावर कार्यक्रम सादर करणार आहेत. पद्मश्री निवेदिता भिडे यांचे प्रमुख भाषण होणार आहे.
यावेळी चिन्मयी मुळे यांच्या “लोकमाता अहिल्याबाई होळकर – द क्वीन ऑफ इंडोमिटेबल स्पिरीट” या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवही उपस्थित राहणार आहेत.