पुण्यातील हायप्रोफाईल अपघातप्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल
अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोर्टाने
त्यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे विशाल अगरवाल आणि सुरेंद्र
अगरवाल यांचा ३१ मे पर्यंत कोठडीत मुक्काम असणार आहे. ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड
केल्याने ससूनमधील दोन डॉक्टराना देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व
प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान पुण्यातील अपघात प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः
लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, ”आधीही सांगितले
होते आणि आताही सांगतो की, या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही
म्हणजे नाहीच. पुणे कार अपघात प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे सुरु आहे.”
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या
अपघातामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघात प्रकरणात दररोज नवनवीन
खुलासे होताना दिसत आहे. तर या प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलगा,
त्याचे
वडील विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली
आहे. तर आता या प्रकरणात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी आणखी एका
व्यक्तीला अटक केली आहे. अतुल घटकांबळे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या
प्रकरणात अतुल घटकांबळेने ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे पुरवल्याची माहिती आहे.
तसेच पोलिसांनी ससूनमधील फॉरेन्सिक डॉक्टरांनाही अटक केली आहे.