पुन्हा एकदा हिमालयाच्या दिशेने आध्यात्मिक प्रवासाला निघालेला सुपरस्टार रजनीकांत पवित्र स्थळांना भेट देण्याचा विचार करत आहेत. दरवर्षी वर्षातून १५ दिवस ते हिमालयाच्या प्रवासाला जातात. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यावर्षी आता डेहराडून, उत्तराखंड येथून या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. डेहराडूनला पोहोचलेल्या रजनीकांत यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की “दरवर्षी मला या प्रवासामध्ये नवीन अनुभव मिळतात, जे मला माझा आध्यात्मिक प्रवास पुन्हा सुरू ठेवण्याची प्रेरणा देतात. यावेळीही मला नवे अनुभव मिळतील” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ह्यावेळी ते चारधाम यात्रा करत केदारनाथ आणि बद्रीनाथचे दर्शन घेणार आहेत .
रजनीकांत यांनी अध्यात्म का महत्त्वाचे आहे यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, संपूर्ण जगाला अध्यात्माची गरज आहे, कारण प्रत्येक माणसासाठी अध्यात्म आवश्यक आहे. अध्यात्मिक असणे म्हणजे शांती अनुभवणे आणि मुळात त्यात देवावर विश्वास ठेवणे समाविष्ट आहे.
अलीकडेच चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथे असलेल्या हिंदू मंदिराला भेट दिली होती. हिंदू मंदिराच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर रजनीकांत यांनी मंदिरात आशीर्वाद घेतानाचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले होते. UAE च्या संस्कृती आणि पर्यटन विभागाने रजनीकांत यांना गोल्डन व्हिसा दिला आहे.यावेळी अभिनेत्याने अबू धाबी सरकार आणि लुलू ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एमए युसूफ अली यांचे व्हिसा मिळवण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. अबू धाबी सरकारकडून प्रतिष्ठित यूएई गोल्डन व्हिसा मिळाल्याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते.
अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर, रजनीकांतने टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित त्यांच्या आगामी ‘वेत्तायन’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. ‘वेत्तायन’मध्ये अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. रजनीकांतचा 170 वा चित्रपट ‘वेट्टियाँ’ या वर्षी ऑक्टोबरमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रजनीकांत आणि अमिताभ मुंबईत एकत्र काही सीन शूट करताना दिसले होते. अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर स्वतःचा आणि रजनीकांतचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ आणि रजनीकांत मिठी मारताना आणि मस्ती करताना दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘थला द ग्रेट रजनीसोबत पुन्हा काम करताना मला अभिमान वाटतो. त्याच्यात अजिबात बदल झालेला नाही. एक नम्र व्यक्ती, तीच साधी नम्र व्यक्ती!!”
रजनीकांत यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त निर्मिती कंपनीने याआधी चित्रपटाचा शीर्षक टीझर लाँच केला होता. या चित्रपटात फहाद फासिल, राणा दग्गुबती यांसारखे कलाकार आहेत. रितिका सिंग, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.