Chhagan Bhujbal On Jitendra Awhad : काल (29 मे) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी मनुस्मृतीचे दहन करत असताना जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडला गेला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच भाजपने देखील आव्हाडांवर जोरदार टीका केली. या प्रकारानंतर आव्हाडांनी अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत माफी मागितली. मात्र, तरीही त्यांच्यावर टीका केली जात आहे. यादरम्यान आता अजित पवार गटाते मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, आव्हाड तिथे एका चांगल्या भावनेने गेले होते. मनुस्मृती जाळली पाहिजे ही त्यांची भावना चांगली होती आणि त्याबाबत कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. मात्र, यावेळी त्यांनी चुकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडला. त्यावर नेमकं कोण आहे हे त्यांनी पाहिलं नव्हतं. पण चूक लक्षात येताच त्यांनी त्याबाबत माफी मागितली आहे. त्यामुळे त्यांची भावना आपण लक्षात घेतली पाहिजे.
जितेंद्र आव्हाज हे विरोधी पक्षांचे नेते आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. तसेच शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा चंचुप्रवेश नकोआहे, हा फोकस दूर होईल. मात्र, आता फक्त जितेंद्र आव्हाड सुरू आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की बहुजन समाजातील आणि मनुस्मृतीला विरोध करणारे जे लोक आहेत त्यांनी मनुस्मृतीचा प्रवेश शालेय शिक्षणात नको याकडे लक्ष द्यावे, असंही छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांनी पाठराखण करताच जितेंद्र आव्हाडांनी त्यांचे आभार मानले. “मा.भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर , आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब ! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने मी आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे” , असे आव्हाड म्हणाले.