Jairam Ramesh : काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी नुकतंच मोठं वक्तव्य केलं आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला स्पष्ट आणि निर्णायक जनादेश मिळेल आणि निकालानंतर 48 तासांमध्ये पंतप्रधानांची निवड केली जाईल, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत रमेश यांनी असेही सांगितले की, विरोधी आघाडीत जो पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल, तोच पक्ष पुढच्या सरकारचे नेतृत्व करण्यासाठी दावेदार असेल.
जयराम रमेश यांच्या मते, 20 वर्षांनंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि विरोधी आघाडीला ‘स्पष्ट आणि निर्णायक’ जनादेश मिळेल. रमेश म्हणाले, “मला आकड्यांबद्दल बोलायचे नाही, तर फक्त एवढेच सांगायचे आहे की आम्हाला निर्णायक बहुमत मिळेल. 272 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे, पण तो निर्णायक नाही. जेव्हा मी निर्णायक जनादेश म्हणतो तेव्हा माझा अर्थ 272 जागांपेक्षा जास्त संख्या आहे.
इंडिया आघाडीचा विजय झाल्यास पंतप्रधानांची निवड आणि नेतृत्व यावर काँग्रेसच्या दाव्याशी संबंधित प्रश्नावर रमेश म्हणाले, “2004 मध्ये निवडणुकीचे निकाल 13 मे रोजी आले आणि 16 मेला संयुक्त पुरोगामी आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर मनमोहन सिंह यांचे नाव 17 मे रोजी समोर आले होते. पण यावेळी मला वाटत नाही की पंतप्रधान निवडीचा निर्णय घेण्यासाठी 48 तासही लागतील”, असेही जयराम रमेश म्हणाले.