Jaya Shetty Murder Case : आज (30 मे) मुंबईतील एका न्यायालयाने 2001 मध्ये झालेल्या हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर छोटा राजनला दोषी ठरवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
विशेष न्यायाधीश एएम पाटील यांनी छोटा राजनला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत खटल्यांसाठी दोषी ठरवले आहे. तसेच सध्या राजन तुरूंगात आहे. 2015 मध्ये त्याला बाली विमानतळावर अटक करून भारतात आणण्यात आले होते. तर सध्या तोदिल्लीच्या तिहार तुरूंगामध्ये आहे.
जया शेट्टी या मध्य मुंबईतील गमदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होत्या. त्यांना छोटा राजन टोळीकडून खंडणीचे फोन येत होते. 4 मे 2001 रोजी त्यांच्या हॉटेलमध्ये टोळीच्या दोन सदस्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. धमक्यांमुळे महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती. मात्र, हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जया शेट्टी यांची दोन शूटर्सनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावेळी हॉटेल व्यवस्थापक आणि एका कर्मचाऱ्याने गोळीबार करणाऱ्यांचा पाठलाग करून एकाला पकडले होते. तसेच छोटा राजनचे नाव गेल्या वर्षी प्रकाशझोतात आले जेव्हा त्याने चित्रपट निर्माते हंसल मेहता आणि ‘स्कूप’ या वेब सिरीजची निर्मिती करणाऱ्या मॅचबॉक्स शॉट्स एलएलपीच्या मालकांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात संपर्क साधला होता.
आपल्या दाव्यात राजनने चित्रपट निर्मात्याने आपला फोटो आणि आवाज वापरल्याबद्दल आक्षेप घेतला होता. या मालिकेचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याला त्याच्या पत्नीकडून याची माहिती मिळाली. राजनच्या म्हणण्यानुसार, चित्रपट निर्मात्याने त्याची परवानगी घेतली नसल्यामुळे हे त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन होते.