देशभरात लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोचल्या आहेत. येत्या शनिवारी म्हणजे १ जूनला या निवडणुकांचा शेवटचा सातवा टप्पा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील होशियारपूर येथे सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता केली.
भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सरकार बनवण्यास उत्सुक आहे हे दर्शवत भाजपने ‘मेगा प्लान’ तयार केला होता. आणि देश पिंजून काढण्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवले होते.
पंतप्रधानांनी या 75 दिवसांत 200 हून अधिक निवडणूक प्रचार कार्यक्रम आयोजित केले, ज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या रॅली आणि रोड शो यांचे जोरदार आयोजन करण्यात आले होते. ‘अबकी बार चारसौ पार’, मोदीकी ‘हमी’ यासारखे टॅग लाईनने मोदींच्या प्रचारांना अधिक प्रभावशाली बनवले. प्रत्येक राज्यात जाताना, मराठीत घोषणा देत , नागरिकांशी संवाद साधत मोदिनी जनतेशी संवाद साधला, एकीकडे त्यांनी सभांना उपस्थित असलेल्या जनसमुदायामधल्या लहान मुले, मुली यांचे कौतुक केले तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले.
लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांसाठी पंतप्रधान मोदींनी विविध मतदारसंघात सभा घेतल्या. काही प्रमुख राज्यांमध्ये जिथे त्यांनी बहुतेक रोड शो आणि रॅली काढल्या त्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि ओडिशा यांचा समावेश आहे.
पीएम मोदींनी विविध माध्यम संस्थांना विक्रमी मुलाखती दिल्या आणि केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विकासकामांवर प्रकाश टाकला.
तसेच धर्मावर आधारित आरक्षण, नागरिकत्व सुधारणा कायद्याची (सीएए) अंमलबजावणी, अयोध्येतील राम मंदिर, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे आणि इतर यासह विविध मुद्द्यांवर आपले काम स्पष्ट केले आणि विरोधकांवर टीका केली.