.पुणे कार अपघात प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल घेत शंभूराज देसाई त्यांना नोटीस बजावणार आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडेही तक्रार करणार आहेत. कालच शंभूराज देसाईंनी संजय राऊतांना कोर्टाकडून नोटीस बजावली होती..आता राऊतांपाठोपाठ आता ते धंगेकरांनाही नोटीस बजावणार आहेत.
पुणे कार अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. याच आरोपांवरून आता रवींद्र धंगेकरांना कायदेशीर बाबींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात रवींद्र धंगेकर यांनी विचारणा करण्यात आली असता त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना थेट उत्तर दिलं आहे. ‘जर विधानसभेत माझ्याविरोधात कोणी हक्कभंग आणला तर माझ्याकडे इतके पुरावे आहेत की मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा’, असे वक्तव्य करत रवींद्र धंगेकर यांनी शंभूराज देसाई यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते धंगेकर ?
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना रवींद्र धंगेकरांनी जाब विचारत अनेक गंभीर आरोप केले होते.त्याचप्रमाणे पुणे उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर रेटकार्ड वाचून दाखवले आणि त्यासंदर्भात उत्तर द्या, काय कारवाई करणार आताच सांगा, असे सं विचारत धारेवरही धरलं होतं. त्यासोबतच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधातही बेताल वक्तव्य केल्याचा आरोप शंभूराज देसाईंच्या कार्यालयाकडून केला जात आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.