अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात सर्व 34 आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. न्यायालयाने निकाल देण्यापूर्वी सुमारे 10 तास चर्चा केली असून ट्रम्प यांच्या शिक्षेबाबत 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय लाजिरवाणा आणि हेराफेरीचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना हुश मनी प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर, अमेरिकेच्या इतिहासातील हे पहिलेच प्रकरण आहे जेव्हा एखाद्या विद्यमान किंवा माजी राष्ट्राध्यक्षाविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला गेला आणि त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. . माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 2016 मध्ये राष्ट्रपती निवडणुकांपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्सला मौन बाळगण्यासाठी पैसे दिल्याचे लपवण्यासाठी आणि व्यवसायांच्या रेकॉर्ड्समध्ये फेरफार केल्याचा आणि त्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांमध्ये डोनाल्ड ट्रम्प दोषी आढळले असून 11 जुलैला डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना चार वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र दोषी ठरल्यानंतर या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. यूएस घटनेत गुन्हेगारी नोंदी असलेल्या उमेदवारांना पदासाठी उभे राहण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा नाही. तुरुंगात असलेली व्यक्ती देखील अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकते.