आसाममध्ये पुराचा जोरदार फटका बसला आहे. 30 मे रोजी आसाममध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांतील 36,000 मुलांसह सुमारे 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या अहवालानुसार, हैलाकांडी जिल्ह्यातील लाला महसूल मंडळ परिसरात पुराच्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
कचार जिल्ह्यात 1.02 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. करीमगंज जिल्ह्यात सुमारे 37000 लोक, नागाव जिल्ह्यात 22354 लोक, होजई जिल्ह्यात 22058 आणि हैलाकांडी जिल्ह्यात 14308 लोक प्रभावित झाले आहेत.
नागाव, होजई, कचार, करीमगंज, हैलाकांडी, गोलाघाट, कार्बी आंगलांग, पश्चिम कार्बी आंगलाँग आणि दिमा हसाव जिल्ह्यातील 22 महसुली विभागांतर्गत 386 गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३२३८.८ हेक्टर पीक क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडाले आहे.
दरम्यान, प्रशासनाने 9 पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 110 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे स्थापन केली आहेत, जिथे 35640 लोकांनी आश्रय घेतला आहे. 2.34 लाखांहून अधिक पाळीव जनावरांनाही याचा फटका बसला आहे.