Nitin Gadkari : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकार येत्या 10 वर्षांत देशातील रस्त्यावरून पेट्रोल आणि डिझेल वाहने पूर्णपणे काढून टाकण्याचा विचार करत आहे, असे नितीन गडकरी यांच्या हवाल्याने म्हटले होते. तर आता नितीन गडकरींनी पारंपारिक वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने (EVs) वापरण्याचे फायदे सांगून अशा प्रकारच्या वाहतुकीच्या पर्यायांचा अवलंब करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, हिमाचल प्रदेशातील मंडी येथे जाहीर सभेला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, भारत 2034 पर्यंत पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याच्या दिशेने काम करत आहे. मला या देशातून 10 वर्षांत डिझेल आणि पेट्रोलची वाहने संपवायची आहेत. आता इलेक्ट्रिक स्कूटर, कार आणि बस आल्या आहेत, असे गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी प्रदूषण पातळी कमी करणे आणि कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्याच्या गरजेवर वारंवार जोर दिला आहे. तर आताही त्यांनी पेट्रोल अन् डिझेलची वाहने संपवणार असल्याची घोषणा केली आहे.