लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने नाशिक येथे सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गात (विशेष) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आबासाहेब होळकर आणि नानासाहेब होळकर यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यात आले.
उज्जैन येथील महामंडलेश्वर दादू महाराज आणि नाशिक येथील उपधर्मादाय आयुक्त विवेक सोनुने यावेळी उपस्थित होते.वर्गाचे सर्वाधिकारी संजय अग्रवाल यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सोनुने यांनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे नमूद करून आपण सर्वजण यासाठी कटिबध्द राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले. महामंडलेश्वर श्री दादू महाराज यांनी आशिर्वचन देताना लोकमातांचा न्यायप्रिय स्वभाव, त्यासाठी आवश्यक ती कठोर भूमिका आणि धर्मासाठी दूरदृष्टी ठेवून केलेली कामे याची आठवण करून देत, केवळ मनुष्यच नव्हे तर अखिल प्राणीमात्रांसाठी त्यांनी बद्रीनाथ ते रामेश्वर आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्वदूर केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती सांगितली
कैलाश गोयल यांनी रा स्व संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांचा प्रसंगानुरूप संदेश वाचून दाखवला. यावेळी संघाच्या वर्गस्थानी उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सूत्रसंचालन निखिल वाळिंबे यांनी केले. हे प्रदर्शन परिसरातील नागरिकांसाठी खुले आहे.