सध्या देशातील अनेक भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
भीषण टंचाई जाणवत आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील पाण्याची मोठी टंचाई असल्याचे
पाहायला मिळत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी दिल्ली सरकारने आज दिल्ली
सचिवालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या तातडीच्या बैठकीचे नेतृत्व हे
जलसंपदा मंत्री आतीशी आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी केले.
दरम्यान जलसंपदा मंत्री आतीशी यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांना पत्र
लिहिले आहे.
दिल्लीच्या जलसंपदा मंत्री आतीशी यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र
शेखावत यांना पत्र लिहून पाणी प्रश्नामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली
आहे. आतीशी यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितले की, “तुम्हाला माहिती
आहे की, दैनंदिन पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दिल्ली यमुना नदीच्या
पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही
दिवसांपासून या नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. वजीराबाद बॅरेजमधील
पाण्याची पातळी कमी झाल्याने दिल्लीत पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.”
तसेच हरियाणाने योग्य प्रमाणात पाणी न
सोडल्यास दिल्लीत भीषण स्थिती निर्माण होईल असे मंत्र्यानी आपल्या पत्रात म्हटले
आहे. दिल्ली शहरातील विविध भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
याबाबतचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. पाणी समस्येमुळे नागरिकांना तासंतास
टँकरमधून पाणी भरण्यासाठी रांगेत थांबावे लागत आहे. ”दिल्लीला
पाण्याचा योग्य वाटा मिळाला पाहिजे. हरियाणा सरकारच्या मनमानी कारवाईमुळे
राज्यातील अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत, असे दिल्लीच्या
जलसंपदा मंत्री आतीशी यांनी सांगितले.