लोकसभा निवडणुकीसाठी आज हिमाचल प्रदेशमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक 31.92 टक्के मतदान झाले, तर ओडिशामध्ये सर्वात कमी 22.64 टक्के मतदान झाले आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत देशभरात एकूण 26.30 टक्के मतदान झाले आहे.
झारखंड 29.55 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 28.10 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 28.02 टक्के, चंदीगडमध्ये 25.03 टक्के, बिहारमध्ये 24.25 टक्के, पंजाब मध्ये 23.91 टक्के आहे. तर सर्वात कमी 22.64 टक्के मतदान ओडिशामध्ये झाले आहे.
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाथीच्या सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील शेवटच्या 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली.
ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित 42 विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान सुरू आहे.आजचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल विविध टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जातील.
लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील प्रदीर्घ प्रचारादरम्यान, पंतप्रधान मोदींनी 75 दिवसांत 200 हून अधिक प्रचार कार्यक्रम आयोजित केले, ज्यात रॅली आणि रोड शो यांचा समावेश होता. त्यांनी अनेक मुलाखतीही दिल्या.
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत 100 हून अधिक रॅली आणि न्याय संमेलन आणि न्याय मंच सारखे जनसंवाद कार्यक्रम घेतले.
लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या सहा टप्प्यांसाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे रोजी मतदान झाले होते. आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. ओडिशात गेल्या चार टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत.