आज लोकसभा निवडणूक 2024 चा शेवटचा म्हणजेत सातवा टप्पा आहे. आजच्या सातव्या टप्प्यात पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे आज 904 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.
आजच्या या शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान होत आहे. तर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. यामध्ये आता अभिनेता आयुष्मान खुराणाने मतदानाचा हक्क बजावला आहे.
आयुष्मान खुराणाने मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “मी माझ्या शहरात मतदान करण्यासाठी आणि माझा हक्क बजावण्यासाठी परत आलो आहे. यावेळी मुंबईत मतदान कमी झाले आहे पण आपण मतदान केले पाहिजे. जर आपण मतदान केले नाही तर आपल्याला तक्रार करण्याचा अधिकार नाही”, असं आयुष्मान खुराणा म्हणाला.