चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-5314 ला आज बॉम्बची धमकी मिळाल्याचे वृत्त समोर येत आहे. यानंतर विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यात 172 प्रवासी होते. आठवडाभरातली विमानात बॉम्ब असल्याची फेक धमकी मिळण्याचे हे तिसरे प्रकरण आहे.
मंगळवारी, दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटच्या शौचालयात ‘बॉम्ब@5.30’ असा शब्द लिहिलेला टिश्यू पेपर सापडला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केली असता ही धमकी फसवी असल्याचे दिसून आले होते.तसेच काल श्रीनगरला जाणाऱ्या विस्तारच्या फ्लाइटसाठी अशी धमकी मिळाली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी 6.50 च्या सुमारास हे फ्लाइट चेन्नईहून निघाले होते. मुंबईला जात असताना त्यात एक बेवारस रिमोट सापडला. यानंतर वैमानिकांनी मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली.
सकाळी 8.45 वाजता हे विमान मुंबई विमानतळावर उतरले. यानंतर विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. बॉम्बच्या भीतीने, फ्लाइटला एका वेगळ्या आयसोलेशन-बे मध्ये नेण्यात आले, जिथे सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले .
इंडिगोने या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की क्रूने प्रोटोकॉलचे पालन करून विमानाला आयसोलेशन बेमध्ये नेले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानाची सध्या तपासणी सुरू आहे आणि सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यावर ते पुन्हा टर्मिनल परिसरात आणले जाईल.