‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यात गंगीची भूमिका साकारणाऱ्या लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले . त्या ८१ वर्षांच्या होत्या.पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
‘गाढवाचं लग्न’ हे हरिभाऊ वडगावकर यांचं वगनाट्य आहे. या नाटकाला भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी ’गाढवाचं लग्न’चे प्रयोग राज्यभरात झाले होते. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती.गंगी या भूमिकेसाठी प्रभा शिवणेकर यांचा भारत सरकारच्या संगीत नाट्य अकादमीने राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला होता.आपल्या कारकिर्दीत त्यांनी १०० हून अधिक भूमिका साकारल्या आहेत.
झाला उद्धार वाल्मीकीचा, चित्ता फाडला जावळीचा, झाशीची राणी, चोखामेळा, दिल्ली हातातून गेली आदी समाजप्रबोधनपर वगनाट्यात प्रभा शिवणेकर यांनी साकारलेल्या भूमिका विशेष लोकप्रिय झाल्या होत्या.