नुकतीच उत्तर प्रदेश सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र यासाठी मृत व्यक्तीचे पीएम करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची पुष्टी करता येईल.
उष्णतेच्या लाटेमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची माहिती तहसीलदार व एसडीएम यांना देणे आवश्यक आहे. यासोबतच मृतांचे पोस्टमॉर्टमही करावे लागणार आहे. कारण पीएमचा अहवाल महसूल विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाणार आहे. त्या आधारे संबंधितांना नुकसान भरपाई दिली जाईल.
तसेच जर एखादी व्यक्ती निवडणूक कर्तव्यावर असेल आणि उष्माघाताने मरण पावली असेल तर पीडित कुटुंबाला 15 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून मिळणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी, पुरेशा सुविधा उपलब्ध कराव्यात जेणेकरून उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू टाळता येतील. त्यासाठी शौचालये बसवणे, रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करणे, गावागावात हातपंप सुरू करणे आदी सूचनाही देण्यात आल्या आहेत.