देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आज शेवटचा टप्पा आहे. एकूण सात टप्प्यात मतदान पार पडले आहे. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर व्हायला सुरवात होणार आहे. त्याकडे सगळ्या देशाचे त्याकडे लक्ष लागले आहे. कारण एक्झिट पोलच्या आकड्यांमधून जनमताचा कौल कोणाला मिळणार ह्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
त्यामुळे 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी चित्र कसे असेल? याचा अंदाज बांधता येणे सोपे होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत? याकडे सर्वसामान्यांबरोबरच राजकीय नेत्यांचे जाणकारांचे , विश्लेषकांचे लक्ष असते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या शिलेदारांनी अबकी बार चारसौ पार म्हणत आपली ताकद पुरेपूर लावली आहे. तसेच भाजपप्रणीत NDA पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असा दावा केला जात आहे. शेयरबाजारापासून सगळीकडे मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेससह घटक पक्ष आपणच बाजी मारणार असा दावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून सुरु होणाऱ्या एक्झिट पोलकडे सगळ्यांचे विशेष लक्ष असणार आहे. आधीच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजांच्या जवळपासच प्रत्यक्षातले निकाल बघायला मिळाले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एक्झिट पोलचे आकडे काय आहेत? याकडे राज्यातील तमाम जनतेचे लक्ष लागलेले आहे.
याआधी मागच्या दोन टर्ममध्ये महाराष्ट्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपची साथ देत सत्ताधारी गटात सहभागी झाले आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे काँग्रेससोबत विरोधी बाकावर म्हणजे महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातली जनता हे बदल स्वीकारत महायुतीला मतदान करते का सहानुभूतीचा फायदा महाविकास आघाडीला मिळतो हे बघण्याची उत्सुकता सर्वाना आहे.