Swati Maliwal : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी अलीकडेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांच्यावर हल्ल्याचा आरोप केला होता. तर आता स्वाती मालीवाल यांनी युट्युबर ध्रुव राठीवर निशाणा साधला आहे. त्यांनी आता ध्रुव राठीवर गंभीर आरोप केले आहेत.
स्वाती मालीवाल यांनी दावा केला आहे की, ध्रुव राठीने त्यांच्या विरोधात एकतर्फी व्हिडीओ बनवला आहे. तेव्हापासून त्यांना बलात्कार आणि खुनाच्या धमक्या मिळत आहेत. तसेच स्वत:ला स्वतंत्र पत्रकार म्हणवून घेणारा ध्रुव राठी प्रत्यक्षात आप पक्षाशी संबंधित असल्याचा दावा स्वाती मालीवाल यांनी केला आहे.
स्वाती मालीवाल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ध्रुव राठी आप पक्षाचा स्वयंसेवक आहे आणि अजूनही नेतृत्वाच्या जवळ आहे. तसेच स्वाती मालीवाल यांनी असेही सांगितले की, त्यांना ध्रुव राठी खूप आवडत होता, पण आता नाही.
पुढे ध्रुव राठींबाबत मालीवाल यांना विचारण्यात आले की, ‘आप’ने ध्रुव राठीचा वापर त्यांच्याविरोधात केला आहे का? त्यावर मालीवाल म्हणाल्या की, हो! माझा असा विश्वास आहे. मला ध्रुव राठी खूप आवडतो, आमच्या घरातल्या सगळ्यांना तो आवडला होता, पण यावेळेस मी त्याच्या विरोधात आहे. तो खूप मोठ्या पदावर आहे, संपूर्ण देश त्याच्याकडे पाहतो आणि ऐकतो. अशा स्थितीत एकतर्फी व्हिडीओ करणे, कारण तो आपच्या नेतृत्वाच्या अगदी जवळचा आहे, असा व्हिडिओ करणे त्याच्यासाठी खूप वाईट आहे, असे मालीवाल म्हणाल्या.