Assam Floods : आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीर आहे. या पुरात रविवारी (2 जून) आणखी तीन मृत्यूची नोंद झाली असून बाधित लोकांच्या संख्येत किरकोळ घट झाली आहे. तर आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, 13 जिल्ह्यांतील 5,35,246 लोक अजूनही पुरामुळे प्रभावित आहेत. शनिवारी 10 जिल्ह्यांमध्ये बाधित लोकांची संख्या 6,01,642 होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील विविध भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे अनेक भागातील बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुरामुळे हैलाकांडी होजई, मोरीगाव, करीमगंज, नागाव, कचार, दिब्रुगढ, गोलाघाट, कार्बी आंगलाँग पश्चिम आणि दिमा हासाओ जिल्ह्यात एकूण 6,01,642 लोक बाधित झाले आहेत.
28 मे पासून पूर आणि वादळामुळे मृतांची संख्या 15 झाली आहे. तर नागावमध्ये 2.79 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून होजईमध्ये 1,26,813 आणि कचरमध्ये 1,12,265 लोक बाधित झाले आहेत.
दरम्यान, एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. त्याचवेळी मणिपूरमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून मदत साहित्य पुरवण्यात आले आहे.