Raveena Tandon : सध्या बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन चांगलीच चर्चेत आहे. कारण शनिवारी (1 जून) रात्री रवीना टंडनच्या घराबाहेर पार्किंगवरून मोठा वाद झाला होता. या वादादरम्यान रवीना टंडनला धक्काबुक्की करण्यात आली. तर आता याबाबत मुंबई पोलिसांनी निवेदन जारी केले आहे.
रवीना टंडनसोबतच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक लोक रवीना टंडनला धक्काबुक्की करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच अभिनेत्रीचा ड्रायव्हरही मारहाण करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तर या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.
https://x.com/riti080/status/1797186803335897570
या घटनेचे वर्णन करताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, रवीना टंडनचा ड्रायव्हर कार पार्क करण्यासाठी मागे वळवण्याचा प्रयत्न करत होता आणि एका कुटुंबातील तीन लोकांना वाटले की त्यांना धडक दिली जाईल. यावरून झालेल्या वादानंतर दोन्ही गट निघून गेले आणि नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रवीना टंडनच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी दुसऱ्या गटीलाही पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले, मात्र दोन्ही बाजूंनी तक्रार करण्यास नकार दिला.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांचे हे वक्तव्य आले आहे, ज्यामध्ये रवीना टंडन लोकांना शांत राहण्याची विनंती करत आहे. रवीना टंडन जमावाला सांगत आहे, मला मारू नका, मला धक्का देऊ नका, मला सोडा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील कार्टर रोडवर रवीना टंडनसोबत ही घटना घडली. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलेला नसला तरी एका अधिकाऱ्याने सांगितले की, खार पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी नोंद करण्यात आली आहे.
रवीना टंडन किंवा तिच्या टीमने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनेबाबत आधी असे बोलले जात होते की, रवीना टंडनच्या ड्रायव्हरने त्याच्या कारने तीन जणांना धडक दिली, त्यामुळे तेथे जमाव जमला आणि लोक संतापले. त्यामुळे लोकांनी रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरला घेराव घातला.