लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. मंगळवारी निकाल लागल्यानंतर नवीन सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मोठा दावा करत सोशल मीडियावर पोस्ट करून भाजपला मिळणाऱ्या जागांची संख्या सांगून टाकली आहे.
काल उमा भारती यांनी सोशल मीडिया X वर पोस्ट करत म्हंटले आहे की, ” काल एक्झिट पोल बघायला मिळाले आहेत, मात्र त्यांचे अंदाज काहीही असले तरी माझा अंदाज आहे की भाजपाला मिळणाऱ्या देशभरातल्या जागा 450 पेक्षा कमी असू शकत नाही. मी सुमारे अडीच महिन्यांपासून हिमालयाच्या दौऱ्यावर आहे, तेथे मला वेगवेगळ्या राज्यांतील यात्रेकरू आणि संत भेटले, ज्यांनी मोदींशिवाय दुसरे कोणतेच नाव घेतले नाही. मोदीजींनी कन्याकुमारीमध्ये ज्या प्रकारे तपश्चर्या केली, ती केवळ अलौकिक व्यक्तीच करू शकते”.
पंतप्रधानाचे कौतुक करत पुढे उमा भारती पुढे म्हणाल्या की, “स्वातंत्र्यानंतर, देवाच्या कृपेने, आता भारताला करिष्मा असलेले पंतप्रधान मिळाले आहेत. बनारसमध्ये मोदीजींनी गंगाजींची त्यांच्या आईशी ज्या प्रकारे भावनिक तुलना केली, त्यामुळे मला विश्वास वाटतो की की माझे अखंड आणि स्वच्छ गंगेचे स्वप्न लवकरच साकार होईल. मध्य प्रदेशमधल्या नदीजोड योजनेच्या केन-बेतवा मॉडेल लिंकचे माझे स्वप्नही पूर्ण होईल, त्यामुळेच आपल्या पंतप्रधानांमुळे माझी ही स्वप्ने पूर्ण होतील या विचाराने मी आनंदी आणि निश्चिंतही आहे”.