सोमवारी पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यामध्ये एक लष्कर-ए-तैयबाचा कमांडर रियाझ अहमद दार याच्यासह आणखी एक दहशतवाद्याचा समावेश आहे. माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी आज सकाळी निहामा परिसरात शोध मोहीम सुरू केली.
यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना जवळ येताना पाहिले आणि त्यांच्यावर गोळीबार सुरू केला,त्यानंतर चकमक सुरू झाली.एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर रियाझ अहमद दार आणि त्याचा सहकारी रईस अहमद यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ अहमद दार उर्फ खालिद हा सर्वात जुन्या जिवंत दहशतवाद्यांपैकी एक होता आणि तो गेल्या 8 वर्षांपासून सक्रिय होता. पोलिस आणि सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश आहे, कारण रियाझ अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये हवा होता. दार सप्टेंबर 2015 मध्ये दहशतवादी गटात सामील झाला होता आणि यापूर्वी अनेकवेळा सुरक्षा घेरातून पळून गेला होता. यावेळी तो सुरक्षा दलाचा घेराव तोडण्यात अपयशी ठरला आणि मारला गेला.