Smriti Irani : भाजपच्या अमेठीतील उमेदवार स्मृती इराणी यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. अमेठीत काँग्रेसचे केएल शर्मा यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. तर आता पराभव झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये उत्साह कमी झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पराभवानंतर स्मृती इराणी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “आयुष्य असंच गेलं..माझ्या आयुष्यातील एक दशक एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाण्यात, लोकांचे जीवन सुधारण्यात, आशा-आकांक्षा जागृत करण्यात घालवले आहे. मी जनतेची सदैव ऋणी राहीन. तर पायाभूत सुविधा, नाले, बायपास आणि इतर अनेक गोष्टांच्या बांधकामात माझ्यासोबत उभे राहिलेल्यांना तुम्ही उत्साह कसा आहे, असे विचाराल तर मी म्हणेन, उत्साह अजूनही आहे”, असं इराणी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्मृती इराणी यांनी अमेठी, उत्तर प्रदेशमधून राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तर 2019 मध्येही त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि राहुल गांधींचा पराभव करत अमेठी मतदारसंघातून खासदार बनल्या होत्या.