Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. या निकालात महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता अजित पवार गटाचे 18 ते 19 नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आज रोहित पवार यांनी कऱ्हाड येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला.
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार आमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवारांच्या संपर्कात आहेत. तर 12 आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. आमच्या संपर्कात जे 19 आमदार आहेत त्यापैकी कोणाला घ्यायचे हे आमचे नेते ठरवतील. पण जे लोक अडचणीच्या काळात निष्ठेने आमच्यासोबत राहिले त्यांना पहिले प्राधान्य असेल आणि जे सत्तेत गेले आहेत त्यांना दुसरे प्राधान्य असेल, असं पवार म्हणाले.
तसेच येत्या काळामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश सारखी जबाबदारी माझ्यासारख्यावर टाकली तर मी निश्चितपणे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले.