नुकतीच एनआयएने मोठी कारवाई केली आहे. पंजाबमध्ये, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने फरारी गँगस्टर गोल्डी ब्रार आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित 9 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. एनआयएने खंडणी आणि गोळीबार प्रकरणाशी संबंधित छाप्यात डिजिटल उपकरणांसह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे.
चंदीगडमधील पीडितेच्या घरावर खंडणी व गोळीबार केल्याप्रकरणी एनआयएची कारवाई करण्यात आली आहे. या वर्षी 20 जानेवारी रोजी स्थानिक पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता आणि NIA ने 18 मार्च रोजी तपास हाती घेतला होता. तर तपास एजन्सीच्या अधिकृत निवेदनानुसार, सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार आणि त्याच्या टोळीच्या माहितीसाठी लोकांकडूनही मदत मागवण्यात आली आहे. चंदीगडमध्ये खंडणी व गोळीबाराच्या गुन्ह्यात एनआयएच्या पथकांनी ब्रार आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित 9 ठिकाणांचा शोध घेतला आहे.
गेल्या वर्षी जयपूरमध्ये करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने गोल्डी ब्रार आणि अन्य 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्याच्या एका दिवसानंतर हा छापा पडला. एनआयएने दूरध्वनी क्रमांक देखील जारी केले आहेत जेथे लोक दहशतवादी आणि त्याच्या साथीदारांबद्दल किंवा टोळीकडून आलेल्या कोणत्याही धमकीचे कॉलबद्दल माहिती देऊ शकतात.
एनआयएच्या तपासात असे समोर आले आहे की, गोल्डी ब्रार याने राजपुरा येथील गोल्डी नावाच्या सहकाऱ्यासह पंजाब, चंदीगड आणि आसपासच्या भागातील व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याचा कट रचला होता. तसेच परदेशात राहणाऱ्या गोल्डी ब्रार आणि त्याच्या साथीदारांनी काही तरुणांना आपल्या टोळीत भरती केल्याचेही एनआयएने म्हटले आहे.