तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आज (11 जून) जाहीर केले की अमरावती ही आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी असेल. आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा केली. टीडीपी, भाजप आणि जनसेनेच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीला नायडू संबोधित करत होते. यावेळी त्यांची आंध्र प्रदेश विधानसभेतील एनडीए नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांच्या नावाखाली खेळ होणार नाही. त्यामुळे आता आमची राजधानी अमरावती आहे. राज्याच्या विभाजनानंतर अमरावती ही राजधानी आहे.
दरम्यान, 2014 ते 2019 या काळात चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी नायडू यांनी अमरावतीला राजधानी बनवण्याची कल्पना मांडली होती. तर 2019 मध्ये त्यांची सत्ता गमावल्याने नायडू यांच्या कल्पनेला धक्का बसला आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीने जबरदस्त विजय मिळवला. त्यानंतर रेड्डी यांनी अमरावती शहराच्या योजना रद्द केल्या आणि तीन राजधान्यांची नवीन कल्पना मांडली होती. तर आता एकच राजधानी ठेवण्याचा निर्णय नायडूंनी घेतला आहे.