जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांपूर्वी रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला होता. यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते. रियासीमध्येही दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी अजून दोन ठिकाणी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील चत्तरगला भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान आणि एक विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.मात्र सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पळता भूई थोडी केली आहे.रात्री उशिरा ही चकमक झाली जेव्हा दहशतवाद्यांनी लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार सुरू केला.
जखमींना एसडीएच भदरवाह येथे नेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गोळीबार केल्यानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. बुधवारी सकाळी जवानांनी दहशतवाद्यांचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे.
जम्मूचे एडीजीपी आनंद जैन यांनी या हल्ल्याची माहिती असून ते म्हणाले की, “दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. भारतीय जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. . मात्र ह्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र दहशतवाद्याविरोधीत ऑपरेशन अद्याप सुरु असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर उपस्थित आहेत.”
दरम्यान, तिसऱ्या घटनेमध्ये कठुआ जिल्ह्यातील हिरानगर भागातील सैदा सोहल गावात मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. तसेच या चकमकीत दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना हिरानगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.