हिमाचल प्रदेशमधील पोटनिवडणुकीतून १४व्या विधानसभेसाठी निवडून आलेल्या सहा नवनिर्वाचित आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया आज पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. विधानसभा सचिवालयातील ग्रंथालय कक्षात सकाळी 11 वाजता शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, कॅबिनेट सदस्य आणि विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
1 जून रोजी राज्यातील सहा विधानसभा जागांसाठी मतदान झाले होते. त्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला होता. या पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने चार तर विरोधी भाजपने दोन जागा जिंकल्या. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये लाहौल स्पीतीमधून अनुराधा राणा, सुजानपूरमधून कॅप्टन रणजित सिंग, कुतलाहारमधून विवेक शर्मा आणि गाग्रेटमधून राकेश कालिया यांचा समावेश आहे. तर भारतीय जनता पक्षाचे सुधीर शर्मा धर्मशाला मतदारसंघातून तर इंदर दत्त लखनपाल हे बडसर मतदारसंघातून निवडून आले आहेत. या सहा आमदारांपैकी अनुराधा राणा, कॅप्टन रणजित सिंह आणि विवेक शर्मा पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत.
31 वर्षीय अनुराधा राणा सध्याच्या 14 व्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत. काँग्रेसचे सहा माजी आमदार अपात्र ठरल्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या सहा माजी आमदारांना उमेदवारी दिली होती. यापैकी फक्त दोनच निवडणूक जिंकू शकले.
68 सदस्यांच्या विधानसभेत सध्या 65 आमदार आहेत. त्यात सत्ताधारी काँग्रेसचे ३८ आणि भाजपचे २७ आमदार आहेत. अपक्ष आमदारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या तीन विधानसभा जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. हमीरपूर, देहरा आणि नालागड विधानसभा जागांसाठी १० जुलैला मतदान होणार असून १३ जुलैला निकाल जाहीर होणार आहेत.