नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जगभरातील दिग्गजांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये आता चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी मंगळवारी (11 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींना विशेष संदेशही पाठवला आहे.
राज्य वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, पंतप्रधान ली यांनी एका संदेशात म्हटले आहे की, चीन-भारत संबंधांच्या मजबूत आणि स्थिर विकासामुळे केवळ दोन्ही देशांच्या लोकांचे कल्याण होणार नाही तर या प्रदेशात स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासही मदत होईल.
पुढे द्विपक्षीय संबंध योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी चीन भारतासोबत काम करण्यास इच्छुक आहे, असेही ली म्हणाले. दरम्यान, नरेंद्र मोदींनी रविवारी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तर यापूर्वी, 5 जून रोजी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते.