नुकतीच एक संतापजनक घटना घडली आहे. इटलीमध्ये खलिस्तानवाद्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. G7 बैठकीसाठी पंतप्रधान मोदींच्या इटली दौऱ्याच्या काही दिवस आधी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इटली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार होते. मात्र, अशातच आता खलिस्तानवाद्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. तसेच महात्मा गांधींच्या या पुतळ्याच्या पायाभरणीवर खलिस्तानींनी हरदीप सिंह निज्जर यांच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिल्या आहेत. मात्र, त्यांनी विक्रमी वेळेत पुतळा स्वच्छ केल्याचे इटालियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इटलीमध्ये 13 ते 15 जून दरम्यान G-7 शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान मोदींनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी महात्मा गांधींच्या या पुतळ्याचे उद्घाटन होणार होते. अशा परिस्थितीत खलिस्तानींचे हे कृत्य अत्यंत लज्जास्पद मानले जात आहे. तर आता या घटनेतील दोषींचा शोध घेण्यासाठी इटलीने कारवाई सुरू केली आहे.