जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडा जिल्ह्यात झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. तसेच या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील दोन-तीन दिवस सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमुळे पोलिसांचा ताण वाढला असून आता पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
मंगळवारी (11 जून) दहशतवाद्यांनी चतरगल्ला, भदेरवाह येथे 4 राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार केला होती. तर बुधवारी (12 जून) जिल्ह्यातील गंडोह भागात सर्च पार्टीवर हल्ला झाला ज्यात एका पोलिसासह सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
एका पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत, जे भदरवाह, थाथरी, गंडोहच्या वरच्या भागात आहेत आणि दहशतवादी कारवाया करत आहेत. तर प्रत्येक दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला 5 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.