भाजप नेते पेमा खांडू यांनी आज हॅटट्रिक साधत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इटानगर येथील डीके स्टेट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या ह्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शाह, जेपी नड्डा, किरेन रिजिजू आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते.
काल खांडू यांची अरुणाचल प्रदेशमधील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पुन्हा निवड झाली, ज्यामुळे त्यांचा सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल केटी पारनाईक (निवृत्त) यांनी खांडू यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.
लोकसभा निवडणुकीसोबत एकाच वेळी झालेल्या निवडणुकीत ६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजपने ४६ जागा जिंकल्या आहेत.पेमा खांडू यांच्यासह पक्षाचे 10 उमेदवार बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले आहेत.
पेमा खांडू हे 2016 पासून अरुणाचलचे मुख्यमंत्री आहेत. नबाम तुकी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी प्रथमच पदभार स्वीकारला होता. खांडू पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते काँग्रेससोबत होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आज पेमा खांडू यांच्यानंतर चाऊना मीन यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याशिवाय बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, बालो राजा, केंटो जिनी आणि ओझिंग तासिंग यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.