सध्या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा अडचणीत आले आहेत. कारण बेंगळुरू न्यायालयाने येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. येडियुरप्पा यांच्या विरोधात हे वॉरंट प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजेच POCSO प्रकरणात जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता बीएस येडियुरप्पा यांना लवकरच अटक करण्यात येण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी एका 17 वर्षीय मुलीच्या आईने आरोप केला होता की, येडियुरप्पा यांनी या वर्षी 2 फेब्रुवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. तर या महिलेच्या वक्तव्याच्या आधारे, पोलिसांनी येडियुरप्पा विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या POCSO आणि कलम 354A (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांनंतर कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी हे प्रकरण तत्काळ प्रभावाने तपासासाठी सीआयडीकडे सोपवले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पुढे येऊन आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले आणि सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच येडियुरप्पा यांनी या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढा देणार असल्याचेही सांगितले होते. तर येडियुरप्पा यांच्यावर आरोप करणाऱ्या 54 वर्षीय महिलेचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता.
यादरम्यान आता कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी आज सांगितले की, सीआयडीने माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे आणि आवश्यक असल्यास येडियुरप्पा यांना अटक केली जाऊ शकते.