परममित्र पब्लिकेशनचे संस्थापक तथा अभाविपचे माजी पूर्णकालिन कार्यकर्ते माधव जोशी यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. मृत्यु समयी ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय, प्रचार प्रमुख प्रमोद बापट,माजी नगरसेवक संजय वाघुले, पत्रकार मिलिंद भागवत आदी मान्यवरांसह आप्त, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभाविपचे पुर्णकालीन कार्यकर्ते म्हणून माधव जोशी यांनी १९८२ ते १९८७ या काळात मुंबई तसेच गुजरात, राजकोट येथे कार्य केले.अभाविपचे पूर्णवेळ काम थांबवल्यावर मेघालय आणि आसाम येथे दोन वर्ष नोकरीच्या निमित्त वास्तव्य केले होते. तेथून परत आल्यावर चरितार्थासाठी माध्यम क्षेत्र निवडले होते. फ्री प्रेस, मुंबई तरुण भारत आणि ग्रंथाली येथे काम केले. दरम्यान, राष्ट्रीय विचारांचा जागर सर्वदुर व्हावा, या हेतुने त्यांनी स्थापन केलेल्या परम मित्र पब्लिकेशनच्या माध्यमातुन अनेकानेक राष्ट्रीय विचार आणि ऐतिहासिक संदर्भाचा उहापोह करणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांना समाजासमोर मांडले. यात छत्रपती शिवाजी महाराज,रामायण,महाभारत ,लोकमान्य टिळकांच्या आठवणी, अहिल्याबाई होळकर तसेच हिंदु दहशतवाद : एक थोतांड, अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद आदी अनेक लिखित व मराठीत अनुवादीत शेकडो पुस्तकांचा समावेश आहे. यंदा परममित्र पब्लीकेशन्सचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अशा या अत्यंत मनमिळावु,मृदु स्वभावाचे माधव जोशी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.