काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी फॉर्म भरताना महायुतीचे नेते तिथे उपस्थित नव्हते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. तर आता यावर अजित पवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच महायुती नव्या उमेदीनं विधानसभेला पुन्हा सामोरी जाईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.
“सध्या आमचा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी आता विकासामध्ये लक्ष घातलं आहे. तसेच आमची महायुती नव्या उमेदीनं पुन्हा विधानसभेला सामोरी जाईल. पराभवाची चिंता मला नाही”, असं अजित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
तसेच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “तुम्ही बातम्या पेरण्याचं काम करता, तो तुमचा अधिकार आहे. पण तुम्हाला काही माहिती नसतं. कारण स्वत: छगन भुजबळ म्हणाले आहेत की मी नाराज नाहीये म्हणून. तरी देखील काही विरोधक अशा बातम्या पिकवत आहे ज्यात तूसभरही तथ्य नाहीये.”
पुढे अजित पवारांनी सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरताना तिथे महायुतीचे नेते उपस्थित का नव्हते? यावर स्पष्टीकरण दिलं. “आम्ही काल उमेदवारी अर्ज भरला पण त्याआधी एक दु:खद घटना घडली होती. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचं निधन झालं होतं. त्यामुळे फडणवीसांना अस्थी विसर्जनासाठी नाशिकला जायचं होतं. तसेच एकनाथ शिंदेंना मी रात्री वर्षावर जाऊन भेटलो. त्यावेळी त्यांना उमेदवाराचं नाव आज किंवा उद्या ठरेल असं सांगितलं. तसेच एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्ही फॉर्म भरून या महायुती सोबत आहे. मात्र, तरीही तुम्ही बातम्या चालवल्या की महायुतीचे नेते दिसत नाहीत म्हणून. पण जर एखादी व्यक्ती दु:खात असेल तर तिला फॉर्म भरायला चला असं म्हणणं योग्य वाटत नाही”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.