लोकसभा निवडणुक 2024 च्या निकालानंतर काँग्रेसचे मनोबल अधिक भक्कम झाले आहे. कारण जरी NDA आघाडीने सरकार स्थापन केले असले तरी इंडीया आघाडीला 234 जागा जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत इंडीया आघाडीने मोठी बाजी मारली आहे.
भाजपला आता नितीशकुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीच्या पाठिंब्यावर सरकार चालवावे लागत आहे. यादरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच एनडीए सरकार कधीही पडू शकते, असा खळबळजनक दावाही मल्लिकार्जुन खरगेंनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, एनडीएचे सरकार चुकून स्थापन झाले आहे. एनडीए सरकार कधीही पडू शकते. कारण मोदीजींना जनादेश नाही, हे अल्पमतातील सरकार आहे. हे सरकार कधीही पडू शकते. आणि असंच व्हावं अशी आमची इच्छा आहे. हे देशासाठी चांगलेच असावं, असं खरगे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आपण देश मजबूत करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. पण आपल्या पंतप्रधानांना काहीही न होऊ देण्याची सवय आहे. पण देश मजबूत करण्यासाठी आम्ही सहकार्य करू, असंही खरगे म्हणाले.