टी-20 क्रिकेट विश्वचषक सुरू असताना टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलला मोठा धक्का बसला आहे. शिस्त मोडल्याप्रकरणी टीम इंडिया व्यवस्थापनाने शुभमन गिल आणि आवेश खान यांच्यावर कडक कारवाई केली आहे .
सध्या शुभमन गिल आणि आवेश खान हे दोघं टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी टीम इंडियासोबत अमेरिकेत आहेत. मात्र, यूएसए लेगचे सामने संपल्यानंतर या दोन्ही खेळाडूंना मायदेशी परतण्यास सांगण्यात आले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला शिस्तभंगाच्या प्रकरणात शिक्षा होत आहे.
एकीकडे शुभमन गिलवर कारवाई केली असताना दुसरीकडे आणखी एका वृत्ताने खळबळ उडाली आहे. शुभमनने रोहित शर्माला इंस्टाग्रामवर अनफॉलो केली असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम फॉलोइंग लिस्टमध्ये रोहित शर्माचे नाव नसल्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दरम्यान, टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी शुभमनचा टीम इंडियात समावेश होणार नसल्याची चर्चा होती. कारण भारताकडे आधीच यशस्वी जैस्वालसारखा सलामीवीर आहे. पण पुन्हा संघ व्यवस्थापनाने शुभमनवर विश्वास व्यक्त केला आणि त्याला प्रवासी राखीव संघात ठेवले. त्याच्यासोबत रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमद हेही राखीव प्रवासी होते. पण या चार क्रिकेटपटूंना आजपर्यंत एकही संधी मिळालेली नाही कारण टीम इंडिया मग ते फलंदाज असो किंवा गोलंदाज सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.