आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमारला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. कारण बिभव कुमारच्या न्यायालयीन कोठडीत 22 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
आज बिभव कुमारला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांचा न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. यासोबतच त्याला 22 जून रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. तत्पूर्वी, शुक्रवारी न्यायालयाने आयओच्या अनुपस्थितीत बिभव कुमारच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली होती. त्याला 18 मे रोजी अटक करण्यात आली होती.
बिभव कुमार अटक केल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर 24 मे रोजी त्याला चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्यावर 16 मे रोजी आयपीसीच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता, ज्यामध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. 13 मे रोजी केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांना क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.