जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या चार वेगवेगळ्या भागात अलीकडेच झालेल्या दहशतवादी घटना आणि २९ जूनपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांची ही महत्त्वाची बैठक असणार आहे. यामध्ये ते सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.तसेच या बैठकीमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्वाचे निर्णय घेतले जातील असे सांगितले जात आहे.
सकाळी ११ वाजता नॉर्थ ब्लॉकमध्ये होणाऱ्या या या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख पदनियुक्त लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक डॉ. तपन डेका, सीआरपीएफ जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक अनिश दयाल सिंग, जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक आरआर स्वेन आणि इतर उच्च सुरक्षा अधिकारी.उपस्थित असणार आहेत.
विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमधील रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात चार दिवसांत दहशतवाद्यांनी चार ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये नऊ यात्रेकरू आणि एक सीआरपीएफ जवान शहीद झाला. तर सात सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत.
याआधीही शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली होती. तिथल्या सुरक्षेबाबत अमित शाह सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे