टेस्ला आणि एक्सचे मालक ELON MUSK यांनी अमेरिकेतील निवडणूकीचा संदर्भ घेत नुकतीच एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी EVM हे विश्वासार्ह नाही. त्याला हॅक करता येऊ शकते असे म्हटले आहे. त्यामुळे EVM ऐवजी अनेक राष्ट्र जुन्या पद्धतीचे बॅलेट मतदानाला प्राधान्य देत आहेत असेही मस्क यांनी म्हंटले आहे. त्यांच्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची री ओढत ईव्हीएम मशीनवर टीका केली आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या आरोप होणाऱ्या बातम्यांचे कात्रण कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोस्ट करत इलॉन मस्क यांची पोस्ट देखील टॅग केली आहे.
भारतातील ईव्हीएम हा एक “ब्लॅक बॉक्स” आहे आणि कोणालाही त्यांची तपासणी करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते जेव्हा लोकशाही संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही फक्त दिखावा म्हणून उरते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते अशा आशयाची पोस्ट कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर केली आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीला महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर हे सुरुवातीला मतमोजणीत पिछाडीवर होते. त्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना एका मताने विजयी करण्यात आले. एका मताचा फरक असल्याने त्यानंतर रवींद्र वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. फेरी मतमोजणीनंतर अखेर पोस्टल बॅलेट मतमोजणीत 48 मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषीत करण्यात आले. या मतदान केंद्रात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकांनी मोबाईल फोन वापरल्याचा आरोप होत आहे. ज्या फोनमुळे ईव्हीएम मशिन अनलॉक केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.