सध्या देशभरात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. सिक्कीम राज्यात देखील अत्यंत जोरदार पाऊस झाला आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बद्रीनाथ महामार्गावर शनिवारी प्रवाशांनी भरलेले एक वाहन अलकनंदा नदीत पडले. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत.
या अपघातावर गढवालचे आयजी करण सिंह नागन्याल म्हणाले की, ”रुद्रप्रयागचे एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. टेम्पो ट्रॅव्हलर नोएडा (यूपी)हून रुद्रप्रयागच्या दिशेने येत होता. तो १५०-२००मीटर खोल दरीत पडला. ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ९ लोकांना रुग्णालयात नेण्यात आले, त्यापैकी १ मरण पावला आहे. या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे या गाडीत किती जण होते हे स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस, एसडीआरएफ आणि स्थानिक लोक बचावकार्यात गुंतले आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियावर सांगितले ”रुद्रप्रयाग जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी कळली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवंगतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा केदार यांना प्रार्थना करतो.