पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर तिसऱ्या टर्म मध्ये देखील केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काम करेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. त्यातच आज पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे जाणार आहेत. पंतप्रधान वाराणसी येथून पीएम-किसान योजनेअंतर्गत सुमारे 20,000 कोटी रुपयांचा 17 वा हप्ता जारी करतील. 17 व्या हप्त्यातून 9.26 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) ने आपल्या X हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीतील सार्वजनिक कार्यक्रम शेअर केला आहे.
भाजपच्या एक्स हँडलवर उपलब्ध असलेल्या तपशीलानुसार , पंतप्रधान मोदी आज वाराणसीमध्ये दुपारी 4:15 वाजता पीएम किसान संमेलनात सहभागी होणार आहेत. यानंतर ते संध्याकाळी 6.15 वाजता काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचतील आणि दर्शन आणि पूजा करतील. ४५ मिनिटांनी गंगा मातेचे दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदी दशाश्वमेध घाटावर पोहोचतील. या घाटावर होणाऱ्या भव्य गंगा आरतीमध्ये ते सहभागी होणार आहेत.
या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १५ जून रोजी पत्रकार परिषदेत भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आणि पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना दिलेला अतूट पाठिंबा याविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना सुरू करण्यात आली. केंद्र सरकारने आतापर्यंत देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे.